अनुभव – चिरंतन सोबती

हे मागचं वर्ष खूप काही शिकवून गेलं. बरे वाईट अनुभव घेत आयुष्याचा एक पाढा मुखोद्गत झाला. मनाच्या पटलावर कोरल्या गेलेल्या या वर्षभरातल्या अनुभवांची उजळणी करायला गेले तेंव्हा वाटलं हे आलेले प्रत्येक अनुभव एक life enriching memory होऊन बसले आहेत. हाच तर उद्देश नाही का मानवी जीवनाचा ? माणूस म्हणून आपण आपल्या या memory मध्ये काय साठवतोय. बरे वाईट अनुभव गाठीशी बांधून चालत आलेल्या कित्येक जन्मोजन्मीच्या प्रवासात काय आत्मसात करतोय. मी खूप काही शिकले या वर्षात. या मागच्या ३० वर्षांत पाटी बऱ्यापैकी कोरीच होती म्हणायचं. किंवा रेघोट्या असतील फार तर फार. पण आता जरा अक्षरांना लकब आलीये. आणि हे अनुभव आठवत बसले ना कि प्रत्येक वेळी नवं गुज सांगून जातात. टागोर म्हणतात, “I am like the road in the night listening to the footfalls of its memories in silence”. तशी मी वरचेवर या अनुभवांचा अर्थ लावत बसते. जसा काळ बदलत जातो तसे अनुभव ही अनुभव संपन्न होतात. आणि मी ही.

म्हणतात Everything is destined to happen  पण त्या destiny पर्यंत जाण्याचा जो रास्ता आहे ना तो आपण निवडतो कदाचित. मग कधी या रस्त्यात खाच खळगे असतात कधी काटे तर कधी अगदी फुलांच्या पायघड्या. फुलांच्या पायघड्या असल्या कि आपण सुखावतो. वाटतं नकोच आता या प्रवासात काट्याकुट्यांचा आणि दगड गोट्यांचा रस्ता. मग समजा रस्त्यात अगदी गार नदी काठची वाळू जरी लागायला लागली तर तीही नकोशी वाटते कारण पायांना फक्त फुलांची सवय. पण या नदी काठावर चालल्याशिवाय खळाळत्या पाण्याचा, पाण्यात पोहोणार्या बदकांचा, रंगीबेरंगी शिंपल्यांचा आनंद तर घेता येणार नाही ना. त्यामुळे रस्ता हा खडतर असला तरी आपण त्यातून किती काय मिळवत असतो. माझी आजी माझ्या आईला नेहेमी विचारायची, “तू देवाजवळ काय मागतेस ?” आईचं उत्तर असायचं, “घरात सुख, समृद्धी असू  दे, सगळ्यांचं भलं कर हेच मागते”. मग आजी म्हणायची, “बाई गं देवाजवळ माग कि पुढला जन्मही बाईचाच घाल. ” आजी असं का म्हणायची हे अशात कळायला लागलंय. स्त्री जन्मात केवढं काही अनुभवतो ना माणूस. सगळ्या भावना, संवेदना जणू खोलवर रुजलेल्या असतात. प्रेम, समर्पण त्याग, सेवा असं किती काही आपसूकच देत जाते स्त्री. ओंजळीने वाटत जाते तिच्याकडचं सगळं. स्त्री जन्म मिळाला ना कि दाता होता येतं. एरव्ही माणसाची जी भोगवादी वृत्ती असते ती स्त्री जन्मात विनासायास मुठीत येते. तसंच तितिक्षा हा एक गुण माणसात असणं सहज साद्ध्य नाही. ती तितिक्षा आपल्या घरातल्या आई, आजीच्या जीवनाचं तर गमक असते. त्याग करत जे काही वाट्याला येतंय, पदरी पडतंय त्याचा भोग घेणं किती सहज जमतं सगळ्या लेकी, सुना, आयांना. आणि आयुष्याच्या गोड संवेदनांसोबत वाईट संवेदनाही येणारच. जसा पर्वत चढायचा म्हणलं कि सोबत दरी ची भीती येणारच. सगळ्या बऱ्या वाईट भाव भावना एकमेकांत गुंफलेल्याच असतात जणू. म्हणतात प्रेम येताना हातात दुःखाचा दिवा घेऊन येतं. पण त्या दुःखाच्या दिव्याने का होईना त्या चिरंतन प्रेमाची ओळख तरी पटते. त्या प्रेममय देवापर्यंत पोहोचण्याचा केवढा महत मार्ग मोकळा होतो नाही या जन्मात?

असाच जन्मो जन्मीचा  प्रवास करत असतो आपण. पडत धडपडत, शिकत अनुभव गाठीशी बांधत चालत असतो. आयुष्य म्हणजे खरंच चिरंतन प्रवास आणि आपण एक प्रवासी पक्षी. कुसुमाग्रजांच्या कवितेतले प्रवासी पक्षी. जे प्रवास करतायत तिमिराकडून तेजाकडे. भेदतायत हे आकाश, हे सूर्यमंडळ आणि करतायत प्रवास अनंताचा. पण हा प्रवास ज्याचा त्याचा असतो. या प्रवासात अनेक पक्षी भेटत जातात आणि पक्ष्यांची शुभ्र माळ होते.

Advertisements

सोशल कीडे

फेसबुक वर एका क्लासमेटने  कुठल्या एका ट्रिप चे शे-दोनशे फोटो टाकले. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतचा अहवाल कळावा इतके फोटो. ३ तासांची documentary film तर नक्कीच तयार होईल. काय नवल आहे लोकांचं.  किती जीवाचा आटापिटा आपलं आयुष्य प्रदर्शनात उभं करण्याचा. आणि त्या प्रत्येक फोटो वर कमेंट करणारेही तेवढेच रिकामटेकडे. एकमेकांचं आयुष्य रवंथ करत बसायचं यातच  यांच्या आत्म्याला समाधान मिळत असावं.
कधी कधी वाटतं की मीच तर चुकीच्या पिढीत जन्माला आले नाही ना? आपलं काही आयुष्य खाजगीत जगावं आणि ते खाजगीच ठेवावं असं कसं वाटत नसावं या सोशल किड्यांना. हा खरं तर ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण झेपत नाही बुवा हा प्रकार आणि बोलल्याशिवाय राहवत नाही. बायकोने काय तर ढोकळा केला,  नवर्याने टाकला फोटो बायकोचा (ढोकळ्याची प्लेट हातात घेऊन). मुख्य काम तर झालं,  मग जो पदार्थ होता तो शेवटी ढोकळा म्हणून खाल्ला असेल नवर्याने (असा माझा अंदाज ).
मागच्या काही दिवसांपूर्वीची गोष्ट. एका जोडप्यासोबत आम्ही फिरायला गेलो. जोडप्याचा एका प्रसिद्ध पर्यटनस्थळी फोटो काढण्यासाठी आणि तो जमेल तेवढया लवकर सोशल मेडिया वर टाकण्यासाठी इतका अतोनात प्रयत्न कि आम्हाला कळेचना कि इतकी अस्वस्थता नेमकी कशासाठी. नंतर कळलं कि त्या जागी फोटो काढण्यासाठी पन्नास-शंभर लोक उभे. सगळ्यांच्या हातात मोबाईल. काढला फोटो कि गेला सोशल मेडिया वर. त्या गर्दीत आम्हीच वेडे का खुळे.  अथांग समुद्राकडे, निळ्याशार पाण्याकडे, पाण्यावर पडलेल्या तांबूस सूर्याच्या प्रतीबिम्बाकडे पाहत उभे होतो. किनार्यावर घेतलेल्या शहाळ्याच्या गोड पाण्याचा आस्वाद घेत, येणाऱ्या प्रत्येक लाटेचा मनसोक्त आनंद घेत होतो. छे काय खुळे होतो आम्ही ! आठवणी डोळ्यांत कैद करत होतो, ना की फोटो अपलोड व्हायला वेळ का घेतोय म्हणून झगडत होतो.
सगळीच देवाण-घेवाण. तू माझ्या स्टेटस ला लाईक कर मग मी तुझ्या करतो असा जणू काही अधोरेखित नियमच असावा. केवढी ही नामुष्की. आणि एवढंच नाही तर दर तासा-दोन तासाला त्या लाईकस आणि कमेंटस ची संख्या मोजणं आलं. सतत secretly monitor करत बसायचं आणि अधे मध्ये ‘ thanks all’ एवढ वाक्य लिहून आपण फार व्यस्त असल्याचा आव आणायचा. सगळं आयुष्य जातंय लाईक्स आणि कंमेंट्स च्या नादात. करायला घेतलं तर किती काही करण्यासारखं आहे. चला लोकांसाठी नाही पण स्वतःसाठी तरी. असं कुठेच वाटत नसावं का ? काहीतरी वाचावं, ऐकावं, एखादं चित्र काढावं किंवा छान फेरफटका मारून यावा ? माणसाला कसलाच छंद नाही हे मुळात शक्यच नाही. केवढा हा वेळ विनाकारण घालवतोय आपण. आपल्या मागची पिढी किती अनुभवसंपन्न आहे नाही ? आपली पाटी मात्रं कोरीच कारण आपण बसलोय मोबाइललमध्ये डोकं घालून likes मोजत.

गझलकार सुरेश भट

माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी;
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा.

किती साध्या सोप्या वाटतात या ओळी समजायला पण किती प्रगल्भ आहेत. नाही ?
वाचल्यानंतर किती तरी वेळ रेंगाळत राहतो हा शेर माझ्या मनात. खरंच हा
जादुई गझलकार सूर्यासारखा माझ्या मनाच्या मध्यरात्री तळपत राहिला.
कुमारभरतीत भटांची कविता होती,

गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे ।
आणीन आरतीला हे चंद्र सूर्य तारे ।

तेंव्हा या कवितेची डेप्थ कळली नाही पण टीनेजरी वर्षांमधून बाहेर पडले तेंव्हा हळूहळू भटांच्या प्रत्येक कवितेची ओळख व्हायला लागली. अक्षरशः भटांची प्रत्येक गझल एक मास्टरपीस वाटत गेली. आणि या तरल कवीने माझ्या मनावर कायमचा ठसा उमटवला. खालच्याही ओळी याच धाटणीतल्या. किती तरुण रक्त सळसळ करायला लावणाऱ्या आहेत. स्फूर्ती देणाऱ्या तर आहेतच पण खडबडून जागं करणाऱ्याची आहेत.

मराठ्या उचल तुझी तलवार
एकिची उचल तुझी तलवार
शपथ तुला — आइच्या दुधाची
घेउ नको माघार, मराठ्या….

तारुण्याच्या पहिल्या पायरीवर असताना तर भटांची प्रत्येक गझल माझ्या मनातल्या अबोल शब्दांचं प्रतिबिंब वाटायची. प्रत्येक शेर जणू माझ्या मनात डोकावून तर लिहिलेला नसावा असं वाटायचं. भटांच्या शब्दांत चपखल बसावी इतकी उच्च माझी भावना नक्कीच नाही पण का कोण जाणे भंगलेल्या भाव भावनांचा अभंग आरसा होती हि गझल. आता हाच शेर बघा ना;

‘कोवळ्या लावण्यगंगेच्या मिठीमाजी बुडालो,
बावरे पाते जिवाचे काप-या श्वासात हाले’.

‘कोवळ्या लावण्यगंगेच्या’ हे शब्द किती समर्पक आहेत. नाही ? कोवळेपणा तर आहेच, पण ‘गंगेचं निर्मळ, सोज्वळ पावित्र्यही आहे. भटांनी प्रत्येक भावनेला किती तरल शब्दांत सांगितलंय. उच्चंकोटीच्या प्रेमाची भावना असावी तर अशी.

तरुण आहे रात्र अजुनी, राजसा निजलास का रे
एवढयातच त्या कुशीवर, तू असा वळलास का रे

हि कविता माहिती नसली तरच नवल. कविता वाचताना असं वाटतं किती वाहतोय शृंगार रस या कवितेतून. पण खरं तर हि कविता भटांनी एका धारातीर्थी पडलेल्या तरुण सैनिकाच्या पत्नीसाठी लिहिली आहे. मृत्युशय्येवर निजलेल्या तिच्या पतीला ती विनवणी करत आहे असा या कवितेचा गूढार्थ आहे. आपण कधी प्रेमभावनांची इतकी खोली गाठली असावी का ? हे फक्त भटांनाच जमो ! तूर्तास तर आपण कवितेचा गूढार्थ समजून घेण्याचा व्यर्थ प्रयत्न करायचा आणि हृदयातून वाहवा द्यायची.

काही दिवसांपूर्वीच भटांची एक कविता ऐकली. ती संगीतबद्ध केलीये हृदयनाथ मंगेशकरांनी आणि गायलीये लता मंगेशकरांनी. काय त्रिकुटी जुळून आलीये. कवितेतला एक शेर आहे,

“मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल,
अन्‌ माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल…”

आता याची सुरुवातच पहा ना. त्या ‘मग’ शब्दाच्या आधी जे काही सुप्त आहे ते कळायला काही मार्ग नाही आणि तेच मनात टोचत राहतं आणि हि कविता वाचकाच्या मनात घर करून बसते. एकमेवाद्वितीय वाटतो हा शेर मला. आपण गूढार्थापासून पुन्हा अनभिज्ञच.

प्रत्येक कविता हि अविष्कार आहे. त्यात मनात येणाऱ्या असंख्य, अगणित भावनांचा चित्रण आहे. तुमच्या माझ्या सारख्या तरल मनाच्या माणसांना भटांनी किती आनंद दिलाय सांगता येणार नाही. प्रत्येक शेर हा उत्कट शेवटाकडे जातो. आता खालचाच शेर बघा ना. अशी तुमचीही झाली असेल कधी स्थिती. दुसऱ्या ओळीत हा शेर मनाला तोडून टाकतो. अर्धवट शेवटाचं काहूर मनात ठेऊन.

एक रान श्वासांचे एक रान भासांचे,
भिरभिरे कुण्या रानी विद्ध पाखरू माझे

भटांना मी कधी कुठे पाहिलं नाही ना कधी भेटण्याचं भाग्य लाभलं. वाईट या गोष्टीचं वाटतं कि त्यांना मी कधी माझ्या मनात त्यांच्याविषयी असलेल्या आदराचं पत्राद्वारे का होईना सांगू शकले नाही. माझ्या आयुष्यात कवितेची गोडी लावणारे भटच. मराठी साहित्य बद्दल आकर्षण निर्माण करणारेही तेच. माझ्या सारख्या मराठी मनाच्या श्रोत्यांसाठी किती काही देऊन गेलेत सुरेश भट. एकटेपणात, सोबतीला गझल देऊन गेलेत. भावगीतं देऊन गेलेत. आणि नं विसरता उल्लेख करण्यासारखं मराठी अभिमान गीतही देऊन गेलेत. फक्त गरज आहे माझ्या तुमच्या सारख्यांनी भटांची हि गझलेची ज्योत तेवत ठेवण्याची.

सूर्य केव्हाच अंधारला यार हो
या, नवा सूर्य आणू चला यार हो

अंतरी काहूर

जरी भासते स्थिर तरी अंतरी काहूर! वर वर शांत दिसणारं मन किती भेदरलेलं, हुरहुरलेलं, सून्न झालेले असतं नाही. एखाद्या संथ वाहणाऱ्या नदीसारखं. पण पाण्याची धडपड त्याची त्यालाच ठाऊक. असं वाटतं मिट्ट काळोखात आपण आपल्यालाच शोधतोय. अस्तित्वहीन असल्यासारखे. आपण कोण आहोत , कुठे आहोत, नेमकं काय करतोय असं वाटायला लागतं. स्वतःला सावरता काय पण शोधताही येत नाही. जसे काचेचे हजार तुकडे व्हावेत आणि कुठला तुकडा कुठे बसवावा हेच कळू नये. आणि सापडले तेवढे तुकडे जोडले तरीही काही तुकडे तर बेपत्ताच.

सुरेश भटांची एक कविता सारखी येते डोळ्यासमोर अशात. असं वाटतं माझ्याकडेच तर पाहून केलेली नसावी त्यांनी हि कविता.

मी एकटीच माझी असते कधीकधी
गर्दीत भोवतीच्या नसते कधीकधी

येथे न ओळखीचे कोणीच राहिले
होतात भास मजला नुसते कधीकधी

जपते मनात माझा एकेक हुंदका
लपवीत आसवें मी हसते कधीकधी

मागेच मी कधीची हरपून बैसले
आता नकोनकोशी दिसते कधीकधी

जखमा बुजून गेल्या सार्‍या जुन्या तरी
उसवीत जीवनाला बसते कधीकधी

सगळं घर भरलेलं पण आपण मात्र एकाकी असतो. वेळ सरता सरत नाही. दिवस संपला कसा बसा तरी रात्र मात्र काळ्या कभिन्न राक्षसारखी समोर येऊन उभी ठाकते. मग दिसायला लागतात आठवणी, आवडत्या माणसांची कमी, भंगलेली स्वप्ने, झालेल्या चुका. नाचायला लागतात डोळ्यांसमोर.

कळत जाते तसे का रे एकटा एकटा होतो जीव
राग रोष सरून कशी आपलीच आपणा येते कीव?

अशावेळी कोणीतरी या कोषातून बाहेर काढणारं असावं असं वाटायला लागतं. पण फुलपाखरू नाही का पडत स्वतःच त्याच्या कोषातून बाहेर. मग आपणही स्वतःला स्वतःच्याच पोटाशी धरून मनसोक्त रडून घ्यावं. निचरा करून टाकावा सगळ्या नाकारात्मकतेचा. “तू होतीस बाई गं म्हणून सहन केलंस आणि अजूनही तू खंबीर आहेस” असा स्वतःलाच दिलासा द्यावा. रात्र संपून पहाटेच्या गर्द काळोखाला भेदत तांबूस आकाशातून येणाऱ्या प्रकाशाच्या साक्षीनं मन निरभ्र करावं. आणि फुलपाखरासारखं उडावं या फुलावरून त्या फुलावर. आयुष्याचा गंध गोळा करत.

गंगे च यमुने च

माझं नदीप्रेम अगदी लहानपानापासूनचं. मी लहान असताना गोदावरीला भयंकर पूर आलेला. तो पूर पाहायला नदीवरच्या पुलावरून खाली वाकून अथांग आणि वरकरणी शांत दिसणाऱ्या पण आतून रौद्र तांडव करणाऱ्या पाण्याकडे पाहताना आलेला शहारा मला अजूनही आठवतो. केवढं ते गोदावरीचं पात्र आणि केवढा त्या पाण्याचा नाद. सगळंच अद्भुत. गोदामाई कारण झाली आणि माझं नद्यांबद्दलच प्रेम आणि कुतूहल वाढतंच गेलं. सगळ्या भारतात फिरून या नद्यांच्या दर्शनाचं भाग्य लाभलं.

वडिलांची बदली साताऱ्याला झाली तेंव्हा वाईच्या ढोल्या गणपतीच्या दर्शनाच्या कारणाने कृष्णा नदीची तोंडओळख झाली. कृष्णा मला तशी स्वभावाने अल्लड, अवखळ वाटली. नाचत बागडत आपली वाट दिसेल तिकडे वाहणारी. मग काय ढोल्या गणपती, मी आणि कृष्णा आमचं एक अतूट नातं निर्माण झालं. मी पुण्याहून जेंव्हा सुटीला साताऱ्याला जाई तेंव्हा गणपतीला नौकरी लावत कसा नाहीस असं भांडून कृष्णेच्या काठावर बसून बाप्पांवर आलेला राग शांत करून येत असे. इथेच साताऱ्याजवळ महाबळेश्वरला वेण्णाही भेटली. कृष्णेची धाकटी बहीणच. इंद्रायणी मात्र धीरगंभीर, लौकिकाचा थांगपत्ता नसलेली, केवळ लोकसेवा हा जीवनधर्म अशा काहीशा विचारांची मला वाटते. कदाचित ज्ञानेश्वर माउली आणि तुकोबा रायांचा  जीवनप्रवाह इंद्रायणीतून वाहत असावा.

मागच्या काही वर्षांत गंगा, यमुना, सरस्वती, अलखनंदा, रावी , बियास, सतलुज या नद्याही पाहायला मिळाल्या. गंगा तर अमृतवाहिनी आहे याची खात्रीच पटली. कित्येक लोकांना आईपण देणारी हि लेकुरवाळी गंगा खरंच देवनदी. तिच्या उगमापासून ती हरिद्वार पर्यंत मला अनेकदा भेटली. प्रत्येक स्थानी ती तितकीच पवित्र आणि नयनरम्य आहे. तिच्या काठावर वसलेल्या हरिद्वार या शहरात तिच्या अद्भुत असण्याचा प्रत्यय येतो. पहाटे आणि संध्याकाळी तिसऱ्या प्रहरी गंगेची आरती असते आणि त्या आरती साठी अक्ख हरिद्वार गंगा तीरावर येतं. एक अलौकिक चॆतन्य सोहळाच असतो तो. यमुना मात्रं फक्त यमुनोत्रीला तिच्या उगमस्थानी भेटली. फार निर्मळ आहे ती. खळाळत्या पाण्याच्या आजूबाजूने वाट काढत यमुनेच्या सहवासात इथे माणूस समाधी अवस्थेत कधी पोहोचतो तेच कळत नाही. इथे यमुनोत्री पासून जवळच बद्रीनाथला सरस्वतीचं उगम आहे. ती अचानक एका भल्या मोठ्या खडकातून अंगावर आल्यासारखी येते आणि काही कोस पुढे लुप्तही होते. व्यासांनी तिला का शाप दिला असावा याचा अंदाज येतो. तिचा नादच इतका कि व्यासांना महाभारताच्या कथनात आणि गणपतीच्या लिखाणात तिने व्यत्यय आणला  असावा हे नक्कीच. रावी, बियास आणि सतलुज या देखील बहिणी बहिणीचं. सतत खळाळत वाहणाऱ्या.

काय नातं असावं या नद्यांसोबत माझं ते उमगलं नाही कधी, पण मला माझं मन शुद्ध आणि पवित्र झाल्यासारखं वाटतं नदीच्या सहवासात. असं वाटतं मी तास, दिवसच काय पण  महिनेही नदीच्या काठावर बसून काढू शकेन. या नदीच्या काठावर बसलं कि नदीचे श्वास आणि माझे श्वास यात अंतर भासत नाही. नदीशी संभाषणात नदी फक्त हुंकाराणेंचं प्रतिसाद देत नाही तर विश्वाचं अंतिम सत्य उलगडून सांगत असावी असं मला नेहेमी वाटतं. नदीला तिचा उगम आणि अंत ठाऊक असतो पण ती तिच्या स्वतःची वाट कोरत ठामपणे शेवटापर्यंत जाते. वाटेत अनेक लहान मोठ्या प्रवाहांशी नातं जोडत जाते. तिच्या वाटेत येणाऱ्या सगळ्यांना तृप्त आणि पवित्र करत जाते. तिच्या जीवनप्रवाहात सगळं सामावून घेत जाते. हि जीवनदायिनी नदी आत्मकेंद्रित जगण्याला लोकसेवेचा अर्थ पटवून देते. मला नर्मेदेचं अजूनपर्यंत दर्शन घडलेलं नाही. जगन्नाथ कुंटेंचं ‘नर्मदे हरं ‘ हे पुस्तक वाचल्यापासून नर्मदेच्या दर्शनाची फार ओढ वाटते. दुधाळ रंगाची नर्मदा कितीतरी सुंदर दिसत असावी पौर्णिमेच्या दिवशी. चंद्राच्या प्रकाशाने प्रकाशित झालेला संगमरवर आणि त्याच्या प्रतिबिंबाने प्रकाशित झालेली नर्मदा. स्वर्गीय आनंद असणार तो. लवकरच नर्मदा प्रदक्षिणा घडावी अशी नर्मदे चरणीच प्रार्थना. अजून एक इच्छा  म्हणजे सिंधूचे दर्शन घडण्याची. ज्या दिवशी मला सिंधू नदीचे दर्शन विना सायास घडेल तो दिवस आयुष्यातला एक विलक्षण दिवस असेल.

इदं न मम

सगळ्यांनाच सगळं मिळतं असं नक्कीच नाही पण जे मिळालय ते ही हातातून सुटलं तर काय अर्थ या जगण्याला? आपण नेमके कशासाठी झगडतोय ते समजायला हवं माणसाला आणि तेवढी समज यायला आयुष्याचा शेवट उजाडतो; सगळं आयुष्य सरतं आणि आपली पाटी कोरीच. जीवाचा आटापीटा करतो आणि पदरी पडतं काय तर शून्य. तेल गेलं तूपही गेलं आणि हाती धुपाटणं राहिलं. मनुष्य जन्म मिळतो तो आत्मोन्नती साधायला आणि आपण मी, माझं, मला अशा सगळ्या अहं भावनेतच गुरफटून बसतो. कोणास ठाऊक का अट्टाहास करत बसतो आपण.

खरंतर जीवन हे एका यज्ञासारखं नाही का? जो यज्ञ करतो आपण काहीतरी मोठं साध्य करण्यासाठी. लहान मोठ्या गोष्टी आपण त्या यज्ञातल्या पवित्र अग्निमध्ये स्वाहा करत जातो आणि म्हणत जातो इदं न मम ! एक एक इच्छा आकांक्षा रुपी समिधा यज्ञात टाकून त्यावर तूपही सोडत जातो जेणे करून त्या समिधा संपूर्णपणे जाळाव्यात. हे सगळं का? कशासाठी? तर एका उदात्त ध्येयपूर्तीसाठी. जे ध्येय कुटुंब, समाज, जगत आणि विश्व कल्याणासाठी असतं. आपण म्हणतो हे अग्नी देवते मला जे जे प्रिय ते ते तूला अर्पण कारण हेच श्रेयस्कर आहे. आधी सगळ्यांचं कल्याण होवो आणि त्यातून माझं कल्याण साधो ! केवढी हि उदात्त भावना. पण आपण मात्र कूपमंडूकच. माझं डबकं, माझं डबकं करत बसतो तिथेच, आपल्याच घाणीत लोळत.

‘मी’ भोवती फिरणाऱ्या या वर्तुळाकार निरर्थक आयुष्याचा काहीतरी अर्थ लावायचा असेल तर ‘मी’ हा केंद्रबिंदू खोडायला हवा. जे काही माझ्या वाट्याला आलंय ते फार चांगलं आहे आणि माझ्यासाठी पुरेसं आहे हा विचार मनात रुजायला हवा. म्हणजे मनातली ईर्षा, खेद, लालसा कमी होईल. पुण्यातली गोष्ट. एकदा धोंडो केशव कर्वे धान्य विकत घ्यायला दुकानात गेले. आणि त्यांनी एका गोणपाटाच्या अर्ध्या पोत्यात धान्य विकत घेतलं आणि ते लाकडी पूलापासून हिंगण्याकडे पायी निघाले. कर्वे पाठीवर कित्येक किलोंचं पोतं घेऊन मजल दार मजल करत चालायला लागले. हे माझं काम आहे आणि ते मी बिनशर्थ, चेहेऱ्यावर तसूभरही असमाधान न बाळगता कारेन अशा भावनेत कर्वे चालत असताना पुण्यात एक अतिशय वाचाल आणि उद्धट म्हणून प्रसिद्ध असलेला टांगेवाला समोर टांगा थांबवून कारवायांना म्हणाला “माझ्या बापा तुझ्या पाठीवरचं पोतं बघून पुढे गेलो तर देव मला नर्कात पाठवील रे. आन ते पोतं इकडं”. अशा कर्तव्यतत्पर,निर्मोही, कुठल्याही परिस्थितीत समाधानी असणाऱ्या माणसासाठी माणसंच काय देवही धावून येईल. याला इंग्लिश मध्ये एक संज्ञा आहे, ‘Delaying Gratification’. म्हणजे तुम्हाला जे भरभरून हवय ते आत्ता हव्या असणाऱ्या क्षणिक सुखासाठी गमावून बसू नका. आधी थोडं दुःख वाट्याला आलं तर ते भोगणं म्हणजे पुढच्या सुखासाठी केलेली इन्व्हेस्टमेंट असते.

मी ही ‘इदं न मम’ म्हणत स्वाहा करायचं ठरवलंय. बघूया तर चिरंतन आनंदडोह सापडतोय का !

सौंदर्यवती

माझी आजी म्हणजे सौंदर्याची खाणच. एखाद्या जगतसुंदरीला लाजवेल असं रूप. आम्हा नातींना तिच्या सौंदर्याचं नेहेमीच कुतुहल वाटायचं. वाटायचं आजी सारखं सौंदर्य आम्हा कोणाजवळही नाही. मोठ्ठ कुंकू, छान चटक रंगाची जरीची साडी, हातात पाटल्या, काचेच्या बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र, एकदाणी, खांद्याला लोकरीची पर्स अडकवून निघाल्या आमच्या आजीबाई हळदी कुंकवाला. कशी ऐटदार राहणी आजीची. आम्हाला सतत वाटायचं आजीच्या सौंदर्याला कोणाची दृष्ट होऊ नये. आजी मात्र हसून म्हणायची “माझ्या मेलीचं वय काय आणि कशाची आलीये दृष्ट बिष्ट !” पण कोणास ठाऊक काय झालं आणि काही वर्षांपूर्वी आजीच्या अंगावर पांढरा डाग दिसायला लागला. तो डाग वाढत गेला आणि आता तर काय आजीचं सर्वांग तांबूस पांढरं झालं. आमची आजी ‘महाश्वेता’ झाली. तसं आजीचं वय सत्तरीच्या आसपास पण स्त्री च्या सौंदर्याला डाग लागला ना की तिच्यातला आत्मविश्वासही उणावत असावा. 

मध्ये एकदा आजी नेहेमी प्रमाणे संक्रांतीच्या हळदी कुंकवाला गेली आणि कुण्या एका महाभाग बाईने म्हणे आजीला कुंकू हातात दिलं. आजी ढसढसा रडली.  ‘सुंदर बाई’ पासून ‘कोड फुटलेली बाई’ असा आमच्या आजीचा प्रवास सुरु झाला. जोमाने काम करणारी आजी दबुन राहायला लागली. लेकी बाळींच्या घरी गेली की खाऊ पिऊ घालणारी आजी स्वयंपाकघरात जायला कचरायला लागली. लग्न कार्यात नटणारी थटणारी आजी नातींची लग्न मोडू नयेत म्हणून दडून राहायला लागली. आजी तर काय; माणसंच टाळायला लागली.    

खरंच नेमका आजीच्या सौंदर्याला डाग लागला की मनाला कोणास ठाऊक. सौंदर्याची परिभाषा आहे तरी काय ? डागाळत असावं का सौंदर्य ? म्हणतात सौंदर्य पाहणाऱ्याच्या डोळ्यांत असतं. माणसाचं मन सुंदर असेल ना तर प्रत्येक गोष्टीत सौंदर्य दिसायला लागतं. हे फार उदात्त विचार आहेत खरंतर पण तिथपर्यंत मजल नाहीतर नाही लोकांना हे तरी का कळू नये की ‘कोड’ हा काही संसर्गजन्य रोग नाही तर एक साधा त्वचा दोष आहे. असो. आता अशा विषयात प्रबोधनाची गरज भासावी हेच दुर्दैव. प्रत्येक माणूस हा inevitably imperfect असतोच आणि मनाने imperfect असण्यापेक्षा शरीराने असणं नक्कीच बरं नाही का?  म्हणतात ना “Beauty is only skin deep, but ugly goes clean to the bone.” आणि माणसात imperfections असतात ती माणसाला माणूस म्हणून perfection पर्यंत नेण्यासाठी. ती असतात आत्मिक प्रगती घडवून आणण्यासाठी ! रवींद्रनाथ टागोर म्हणतात “Clouds come floating into my life, no longer to carry rain or usher storm, but to add color to my sunset sky.” 

आजी कणखर आहे म्हणून वाचाळ लोकांची निरर्थक बडबड सहन करू शकली.  या महाश्वेतेला आत्मविश्वास सावरायला, वाढवायला तिच्या जोडीदाराची भक्कम साथ मिळाली. मुलं-बाळं, लेकी-सुना देखील समजून घेणाऱ्या लाभल्या. बाहेरच्या जगाचं माहित नाही; पण घरात मात्र आजीचाच बोलबाला टिकून राहिला.  माझ्या आजीच्या भाळी सूर्य तर आहेच पण तिच्या त्वचेखाली चंद्राचा वास आहे. म्हणूनच आमची आजी चंद्र प्रकाशासारखी चंदेरी आहे.